मेहुण्याचा मृत्यू असह्य झाल्याने साल्यानेही केली आत्महत्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मेहुण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने दुःखावेगात साल्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. ४) उघडकीस आली. एकाच कुटुंबातील दोघांचा वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
वडगाव येथील सीतानगरात राहणारा सिद्धार्थ ऊर्फ पिंट्या शिवाजी जाधव याला भेटण्यासाठी त्याचा साला विनोद लक्ष्मण जाधव (२५, रा. साठेनगर, वाळूज) हा शुक्रवारी (दि. ३) आला होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून (एमएच २०, ईक्यू-५८२८) वडगाव येथील तलावाकडे गेले. तेथे सिद्धार्थ पोहण्यासाठी तलावात उतरला; मात्र पाण्यातील अंदाज न आल्याने तो बुडाला.
रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी न परतल्याने शनिवारी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी वडगाव तलावाच्या काठी सिद्धार्थचे कपडे, मोबाईल आणि दुचाकी आढळून आली. साला-मेहुणे दोघेही पाण्यात बुडाल्याच्या संशयावरून पोलिसांना आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एमआयडीसी वाळूज व मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम राबवून मृतदेह पाण्याबाहेर काढला. 
विनोदची रेल्वेखाली उडी
एकीकडे अग्निशमन दलाचे जवान तलावात विनोदचा शोध घेत असतानाच, दुसरीकडे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास विनोदने गादिया विहारसमोरील रेल्वे रुळावर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. दोघांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दोघांच्या मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली आहे.